प्रकरण क्र. १ - माहीती तंत्रज्ञान, इंटरनेट आणि तुम्ही
माहीती आणि तंत्रज्ञान
२१ वे शतक हे माहीती तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. एक काळ असा होता की एखादी माहीती व्यक्त करण्यासाठी, साठविण्यासाठी तसेच दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी खूप वेळ, श्रम आणि खर्च करावा लागत असे. काळानुसार यात प्रचंड बदल झाले. आज माहीती तंत्रज्ञानामुळे एखादी माहीती व्यक्त करणं, साठविणं तसेच ती जगभर पाठविणं अगदी सहज शक्य होत आहे. यामध्ये माहीती तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका आहे.
माहीती म्हणजे काय?
व्याख्या - ज्यामुळे आपणांस एखादी वस्तु, व्यक्ती, ठिकाण, किंवा मूर्त अमूर्त संकल्पना याविषयी अर्थबोध होतो, त्यास आपण माहीती असे म्हणतो.
माहीती ही जून्या काळापासून तर आजपर्यंत विविध प्रकारांमध्ये बघायला मिळते. माहीतीचे स्वरुप, तिची साठवूक करण्याची पध्दत व ती पूढच्या पिढीकडे संक्रमित करण्याची पध्दत यामध्ये प्रचंड बदल झालेला आपणांस बघायला मिळतो. सर्वसाधारणपणे माहीती ही दोन प्रकारची असते.
अ. अर्थहिन माहीती : या माहीतीला डेटा (Data) असेही म्हणतात. म्हणजेच प्रक्रीया न केलेली माहीती. याप्रकारच्या माहीतीतून कुठलाही अर्थबोध होत नाही. उदा. ब क द ही केवळ मुळाक्षरे आहेत. यातून काहीच बोध नाही. परंतु याच अक्षरांना बदक अशा पध्दतीने मांडल्यास आपणांस एका पक्षाचे नाव दिसेल. ज्यातून अथबोध झालेला दिसेल.
ब. अर्थपूर्ण माहीती : ही माहीती Information म्हणून ओळखली जाते. या प्रकारची माहीती ही काहीतरी संदेश किंवा ज्ञान देणारी असते. ज्यामुळे एखादी व्यक्ती, ठिकाण, वस्तु, भावना किंवा संकल्पना स्पष्ट होत असते. तसेच ती माहीती ही मजकूर, चिन्हे, संख्या, चित्र, आकृती, व्हिडीओ, ऑडियो इ. कुठल्याही प्रकारची असू शकते.
माहीतीची रुपे -
माहीती तंत्रज्ञान म्हणजे काय?
डेटा Data (प्रक्रिया न केलेली माहीती) वर प्रक्रीया करुन त्याचे माहीती Information (प्रक्रिया केलेली माहीती) मध्ये रुपांतर करणाऱ्या तंत्रज्ञानाला माहीती तंत्रज्ञान Information Technology असे म्हणतात.
माहीती तंत्रज्ञान म्हटले की सर्वप्रथम आपणांस संगणक दिसते, परंतु केवळ संगणक म्हणजेच माहीती तंत्रज्ञान आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. माहीती तंत्रज्ञान हे वापर करणारे लोक, पध्दती, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, डेटा आणि इंटरनेट या सर्व बाबींचे मिळून बनलेले आहे. यातील एकही बाब नसेल तर माहीती तंत्रज्ञान अपूर्ण आहे.
माहीती तंत्रज्ञानाचे मुख्य पाच घटक -
माहीती तंत्रज्ञानाच्या सर्व पाच घटकांची माहीती खालीलप्रमाणे –
वापर करणारे लोक (People) –
पर्सनल कंम्प्युटर तयार करतांना सर्वसामान्य लोकांना समोर ठेवूनच त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. जर सर्वसामान्य उपभोक्ता, अंतिम वापरकर्ता नसेल तर माहीती तंत्रज्ञान अपूर्ण आहे. त्यामुळे वापर करणारे लोक या घटकाकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
माहीती तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश वापरकर्त्यास सुविधा उपलब्ध करुन देणे हाच आहे. लोकांची उत्पादनक्षमता, कार्यक्षमता वाढविणे तसेच लोकांच्या पैशाचा, वेळेचा तसेच श्रमाचा अपव्यय होऊ नये यासाठी माहीती तंत्रज्ञाना महत्वाची भूमिका पार पाडते. म्हणून वापर करणारे लोक हा माहीती तंत्रज्ञानाचा मुख्य घटक मानला जातो.
प्रक्रिया (Process) –
सर्वसाधारणपणे सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि डेटा यांचा वापर करतांना लोकांनी पालन करण्याचे नियम किंवा दिशानिर्देश म्हणजेच प्रक्रिया होय. कुठलीही प्रक्रिया करतांना व्यक्तीला त्या प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहीती असणे आवश्यक असते. अन्यथा कुठलेही हार्डवेअर, सॉफ्टवेअर किंवा डेटा हाताळतांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. प्रक्रियेचे जूजबी ज्ञान असल्याशिवाय माहीतीवर प्रक्रिया करणे अशक्य आहे. त्यामुळे हार्डवेअर तसेच सॉफ्टवेअर निर्माते आपल्या उत्पादानाबरोबर ते कसे वापरायचे याबाबत मॅन्युअल छापील किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरुपात देत असतात. त्यात सर्व प्रक्रियांबद्दल सविस्तर माहीती दिलेली असते.
सॉफ्टवेअर (Software)
सॉफ्टवेअर म्हणजे सूचनांचा संच होय. एखाद्या प्रोग्राममध्ये काम कसे करायचे याबाबत दिलेल्या चरणबध्द सूचना म्हणजेच सॉफ्टवेअर होय. कुठलेही सॉफ्टवेअर हे डेटा (प्रक्रिया न केलेली तथ्ये) चे माहीती (प्रक्रिया केलेली तथ्ये) यामध्ये रुपांतरण करण्यासाठी निर्माण केलेले असतात.
सॉफ्टवेअरला प्रोग्राम असेही म्हटले जाते. सॉफ्टवेअरचे सर्वसाधारणपणे दोन प्रकार पडतात.
सिस्टीम सॉफ्टवेअर –
जे सॉफ्टवेअर संगणक वापरते, त्यास सिस्टीम सॉफ्टवेअर असे म्हणतात. सिस्टीम सॉफ्टवेअर हे कंप्युटर हार्डवेअरशी अंतर्गत क्रिया करण्यासाठी अप्लिकेशन सॉफ्टवेअरला सक्षम करते. सिस्टीम सॉफ्टवेअर प्रत्यक्ष युजरला दिसत नाही, म्हणून त्या बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर असेही म्हणतात. सिस्टीम सॉफ्टवेअर हा एकच प्रोग्राम नसतो, तर तो अनेक प्रोग्राम्सचा संच असतो. ज्यात खालील काही बाबींचा समावेश असतो.
A. ऑपरेटिंग सिस्टीम – संगणकामध्ये असणा-या सर्व सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर यांच्यामध्ये समन्वय प्रस्थापित करण्यासाठी हा प्रोग्राम काम करत असतो. संगणकाचे मूलभूत पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा प्रोग्राम काम करतो. स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स आणि इतर मोबाईल डिव्हाईसेस एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम वापरतात. त्यांना रियल-टाईम ऑपरेटिंग सिस्टीम्स असे देखील म्हणतात. डेस्कटॉप कंप्युटर्स स्टँड अलोन आपरेटिंग सिस्टीम वापरतात तर नेटवर्क मध्ये काम करणारे संगणक नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम वापरतात.
B. युटिलिटीज् – संगणकावर काम करणे सोपे, सुलभ व सुरक्षित होण्यासाठी सहाय्य करणारे प्रोग्राम्स म्हणजे युटिलिटीज् होय. युटिलिटीज् हा एक प्रोग्राम नसून विविध प्रोग्रामचा संच आहे. जो युजरला संगणकावर काम करण्यासाठी मदत करत असतो. उदा. अँटिव्हायरस प्रोग्राम्स. हे प्रोग्राम कंप्युटर व्हायरस किंवा हानिकारक प्रोग्रामपासून तुमच्या संगणकाचे संरक्षण करत असतात.
C. डिव्हाईस ड्रायव्हर्स – हे विशेष प्रोग्राम असतात, जे विविध इनपूट किंवा आऊटपूट उपकरणांना कंप्युटर सिस्टीमसोबत संवाद साधण्याची परवानगी देण्यासाठी डिझाईन केलेले असतात.
अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर -
अ. या प्रकारचे सॉफ्टवेअर हे अंतिम वापरकर्त्यांसाठी तयार केलेले असतात. याचा उपयोग करुन यूजर आपले विविध उद्देश साध्य करत असतो. यामध्ये खालील सॉफ्टवेअरचा समावेश केला जातो.
जनरल पर्पज अॅप्लिकेशन –
हे सॉफ्टवेअर जवळपास सर्वच क्षेत्रात वापरले जाते, म्हणून याला जनरल पर्पज अॅप्लिकेशन असे म्हणतात. दैनंदिन जीवनामध्ये वापरात असलेली सर्व अॅप्लिकेशन यात समाविष्ट असतात.
स्पेशलाईज्ड अॅप्लिकेशन्स –
या प्रकारात एखादा विशिष्ट उद्देश साध्य करणारी अॅप्लिकेशन असतात. साधारणपणे सर्वच लोकांना याची गरज पडत नाही. विशेष क्षेत्रात काम करणा-या लोकांना ही अॅप्लिकेशन वापरावी लागतात. उदा., ग्राफिक्स आणि वेब ऑथरिंग प्रोग्राम्स.
मोबाईल ॲप्स –
A. स्मार्टफोन आणि टॅब्लेट्स कंप्युटर्स सारख्या डिव्हाइसेससाठी डिझाईन केलेले अॅप्लिकेशन म्हणजे मोबाईल अॅप्स होय. सध्या या अॅप्सची संख्या ५ लाखाच्या वर आहे. सोशल नेटवर्कींग, गेम्स, व्हिडीओ आणि संगीत डाऊनलोड करण्यासाठीचे अॅप्स सर्वात लोकप्रिय आहेत.
हार्डवेअर (Hardware) –
हार्डवेअर म्हणजे उपकरणे होय. माहीतीवर प्रक्रीया करण्यासाठी आपण जी काही उपकरणे वापरतो त्या सर्व उपकरणांना हार्डवेअर असे म्हटले जाते. यात सर्वसाधारणपणे कंप्युटर सिस्टीमचा समावेश होत असल्यामुळे कंप्युटरचे प्रकार पाहणे आवश्यक आहे. कंप्युटरचे प्रामुख्याने चार प्रकार पडतात.
कंप्युटरचे प्रकार
अ. सुपर कंप्युटर –
यालाच परम संगणक असेही म्हणतात. हा संगणक सर्वात शक्तीशाली संगणक आहे. याचा उपयोग वैश्विक हवामानाच्या विश्लेषणासाठी व त्याच्या भविष्यवाणीसाठी केला जातो. आयबीएमचा ब्ल्यु जीन सुपरकंप्युटर जगातील सर्वात जलद कंप्युटर्सपैकी एक आहे.
आ. मेनफ्रेम कंप्यूटर –
हे संगणक सुपर कंप्युटर एवढे शक्तीशाली नसले तरी या संगणकाचा प्रोसेसिंग स्पीड आणि डेटा स्टोअरेज क्षमता खूप मोठी असते.
इ. मिडरेंज कंप्यूटर –
यांना मिनी कंप्युटर असेही म्हटले जाते. ज्यांना सर्व्हर्स असे देखील म्हणतात. यांची क्षमता मेनफ्रेम कंप्युटरपेक्षा कमी असली तरी पर्सनल कंप्युटरपेक्षा हे अधिक वेगवान असतात. विविध मोठ्या कंपन्यांमध्ये या प्रकारचे संगणक मोठया प्रमाणात वापरले जातात.
ई. मायक्रो-कंप्युटर/ पर्सनल कंप्युटर –
कमी शक्तीशाली परंतू जगात सर्वात जास्त वापरले जाणारे संगणक म्हणून या संगणकाकडे पाहीले जाते. याचे चार प्रकार पडतात. डेस्कटॉप कंप्युटर, नोटबूक/लॅपटॉप कंप्युटर, टॅब्लेट पीसी आणि स्मार्ट फोन्स इ.
पर्सनल कंप्युटर हार्डवेअर –
पर्सनल कंप्युटरमध्ये सर्वसाधारणपणे खालील एकूण पाच प्रकारचे हार्डवेअर/डिव्हाईसेस वापरले जातात.
A. इनपूट डिव्हाईसेस – संगणकाला विविध इनपूट देण्यासाठी लागणारी सर्व उपकरणे यामध्ये येतात. उदा., माऊस, किबोर्ड, स्कॅनर, डिजिटल कॅमेरा, मायक्रोफोन इ.
B. आऊटपूट डिव्हाईसेस – प्रक्रिया केलेली सर्व माहीती यूजर पर्यंत पोहोचविणा-या उपकरणांना आऊटपूट डिव्हाईसेस असे म्हणतात. यामध्ये मॉनिटर, स्पीकर्स आणि प्रिंटर्स या उपकरणांचा समावेश होतो.
C. प्रोसेसिंग डिव्हाईसेस – यामध्ये माहीतीवर प्रक्रीया करण्यासाठी वापरण्यात येणा-या सिस्टीम युनिटचा समावेश होतो. सिस्टीम युनिटमध्ये असणारी मदरबोर्ड, मायक्रोप्रोसेसर, बसलाईन्स, रॅम, रॉम मेमरी, पोर्टस्, सॉकेट्स, आयसी, एक्स्पांशन स्लॉटस् आणि कार्ड्स या सर्व बाबींचा समावेश होतो.
D. स्टोरेज डिव्हाईसेस – संगणकामध्ये प्रक्रिया केलेली माहीती ज्या ठिकाणी साठवली जाते, त्या सर्व उपकरणांना स्टोरेज डिव्हाईसेस असे म्हणतात.
E. कम्युनिकेशन डिव्हाईसेस – एका संगणकामधील माहीती दुस-या संगणकामध्ये पाठविण्यासाठी मोडेम या कम्युनिकेशन डिव्हाईसची गरज असते. या उपकरणामुळे संगणकाला कनेक्टिव्हीटी मिळते.
डेटा (Data)
प्रक्रिया न केलेल्या माहीतीला डेटा असे म्हणतात. यामध्ये अंक, अक्षरे, चिन्हे, विविध आकार यांचा समावेश होतो. डेटा संकलन करुन त्यावर प्रक्रिया करुनच माहीती तयार होत असते. त्यामुळे डेटा हा माहीती यंत्रणेतील महत्वपूर्ण घटक आहे.
कनेक्टिव्हीटी (Conectivity) –
संगणकाला केवळ डिजिटल भाषा समजते. जेव्हा संगणक एखाद्या नेटवर्कला जोडला जातो. अशावेळी कम्युनिकेशन चॅनल म्हणजेच माहीती वाहून नेणारे साधन हे केवळ ॲनालॉग भाषा वाहून नेऊ शकते. अशावेळी संगणकातील डिजिटल माहीतीला ॲनालॉग मध्ये रुपांतरीत करणे आवश्यक असते, या क्रियेला मॉडयुलेशन असे म्हणतात. हे काम करण्यासाठी मोडेम हे उपकरण वापरले जाते. तसेच जेव्हा ही माहीती ज्या संगणकाकडे पाठविली जाते, त्या संगणकाला ॲनालॉग माहीती कळत नाही. अशावेळी तिथेही ॲनालॉग माहीती ही पून्हा डिजिटल माहीतीमध्ये रुपांतरीत करणे आवश्यक असते, या प्रक्रियेला डिमॉडयुलेशन असे म्हणतात. आणि हे काम देखील मोडेम करीत असतो. अशाप्रकारे नेटवर्क मधील दोन्हीही संगणकाला मोडेम हे उपकरण जोडलेले असते आणि मॉडयुलेशन व डिमॉडयुलेशन या दोन्ही प्रक्रियेच्या माध्यमातून माहीतीची देवाणघेवाण् होत असते.


No comments:
Post a Comment